अमरावती विभागाच्या विकास कामांचा आढावा

* वन विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या २६ प्रकल्पांना पर्यायी जागा
* धडक कार्यक्रमात ४५ प्रकल्पांचा समावेश
* ४००ट्रान्सफार्मर १५ दिवसात पूर्ण करणार
* २० हजार कृषी पंपांना मार्च 15 पर्यत विज  
* टंचाई परिस्थिती हाताळण्याला सर्वोच्च प्राधान्य  
* ५ लक्ष सोलरवरील विद्युत पंप लावणार  
* विभागातील महसूल अधिकाऱ्यांची सर्व पदे  ८ दिवसात भरणार
* 20 सिंचन प्रकल्पांना तात्काळ सुधारीत प्रशासकीय मान्यता

सिंचनाचा अनुशेष पूर्ण करण्यासाठी ३ वर्षाचा धडक कार्यक्रम

अमरावती विभागातील अपूऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या टंचाईपरिस्थितीचा आढावा तसेच सिंचन, उर्जा,कृषी, बांधकाम तसेच इतर विभागांच्या विकास योजनांचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.  विभागात मागील पाच वर्षात सर्वात कमी पाऊस  पडल्यामुळे  ७ हजार २४१ गावे ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी असल्यामुळे   या गावांमध्ये तातडीने टंचाई परिस्थीतीत करावयाच्या उपाययोजना लागू करण्याच्या सूचना देतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  म्हणाले की, विभागातील सिंचन प्रकल्प पुर्ण करून प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी अधिकाऱ्याने  सकारात्मक मानसिकता ठेवून अपुर्ण राहीलेले सिंचन प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करावेत.

सिंचनाचा अनुशेष पूर्ण करण्यासाठी कालबध्द कार्यक्रम तयार करण्याच्या सूचना देतांना मुख्यमंत्री म्हणाले की, सिंचन क्षमता निर्माण होईल अशा प्रकल्पांचे प्रस्ताव सादर करतांनाच ८० टक्के पूर्ण झालेले सिंचन प्रकल्पांना  प्राधान्य देण्याचे धोरण असून फेरप्रशासकीय मान्यतेमुळे प्रलंबीत असलेल्या प्रकल्पांपैकी २० महत्वाच्या प्रकल्पांचे प्रस्ताव प्रचलित नियमानुसार  आठ दिवसात सादर करा अशा सुचनाही जलसंपदा विभागाला यावेळ मुख्यमंत्र्यांनी दिल्या. वन विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या २६ प्रकल्पांना पर्यायी जागा देणार असून या कायद्यामुळे केद्र शासनाकडे  ६ प्रकल्प  प्रलंबित आहेत. अशा प्रकल्पांच्या प्रस्तावांचे प्राधान्य ठरवून तात्काळ मंजूर करण्याबाबत केद्र शासनाकडे पाठपूरावा करण्यात येईल असे सांगतांना मुख्यमंत्री म्हणाले की, सिंचन व्यवस्थापनाच्या दृष्टीने अत्याधुनिक पध्दती वापरता येईल का या दृष्टीने विभागाने प्रयत्न करावा. लोकप्रतिनीधींनी प्रलंबीत असलेल्या तसेच बंद असलेल्या सिंचन प्रकल्पाबाबत बैठकीत सादर केलेल्या माहितीनुसार जलसंपदा विभागाने वस्तूस्थितीची माहिती द्यावी अशी सुचनाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. 

महसूल विभागातील रिक्त पदे भरणार

विभागातील १४ उपजिल्हाधिकारी, ३ अतिरीक्त जिल्हाधिकारी, ८ तहसिलदारांचे रिक्त असलेले पदे एक आठवडयात  भरण्यात येतील अशी घोषणा यावेळी केली.  विभागात बदली झालेल्या अधिकाऱ्यांना तातडीने नियुक्तीच्या पदावर रूजू करून घेण्यात येईल. जे अधिकारी रूजू होणार नाहीत अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

४०० ट्रान्सफार्मर तात्काळ बदलणार    

विभागातील बंद पडलेले विद्युत ट्रान्सफार्मर बसविण्यासाठी अधिकाऱ्याने मिशन म्हणून काम पूर्ण करावे व येत्या सात दिवसात हे काम पूर्ण करावे अशा सुचना.  विभागात तात्काळ ४०० ट्रान्सफार्मर 15 दिवसात बदलन्याची प्रक्रिया पूर्ण करावी व अनधिकृत असलेल्या कनेक्शन संदर्भात योजना जाहीर करून शेतकऱ्यांचे विज कनेक्शन अधिकृत करण्याची प्रक्रिया राबवावी. ज्या शेतकऱ्याने विज कनेक्शन साठी अर्ज केले आहेत. त्यांना विज जोडणी देण्याबाबत कालबध्द कार्यक्रम तयार करावा.

 २५ लक्ष सोलर विद्युत पंप बसविणार        

दरवर्षी ५ लक्ष विद्युत पंप बसविण्यात येणार असून यामुळे विजेची वाढती मागणी तसेच उद्योगावरील विजेचा भार कमी होण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात सोलर पंप देण्याबाबत धोरण ठरविण्यात येत असून ही योजना शेतकरी आत्महत्याग्रस्त असलेल्या भागांसाठी लागू करण्यात. अमरावती येथे एम- आर- आय, सोनोग्राफी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येणार असून एम. बी. बी. एस. झालेल्या स्थानिक उमेदवारांना प्राथमिक आरोग्य केद्रात प्राधान्य देण्यात येणार.